Weather Alert मध्य महाराष्ट्र व त्याच्या आसपासच्या भागांत सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, याचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील काही तासांत कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, आज सायंकाळपासून जिल्ह्याच्या अनेक भागांत दमदार पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती, त्यामुळे काही भागांत उघडीप जाणवली होती. मात्र, भातरोप पुनर्लागवडीची कामे अद्याप सुरू असल्याने शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य मध्य प्रदेश आणि नैऋत्य उत्तर प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो सध्या ताशी १७ किलोमीटर वेगाने पश्चिमोत्तर दिशेने सरकत आहे.
हा कमी दाबाचा पट्टा पुढील २४ तासांत आणखी कमकुवत होऊन एका स्पष्ट दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होण्याची शक्यता आहे. या हवामान बदलामुळे पर्जन्यद्रोणीचा एक पट्टा ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. परिणामी, मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या भागांत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट प्रभाव कोकणावर पडणार असून, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज सकाळपर्यंत हवामान उघड असतानाच, सायंकाळी सातनंतर पावसाचा जोर वाढल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्याच्या अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांत सरी कोसळू लागल्या आहेत. या पावसामुळे नद्या व नाले पुन्हा भरून वाहू लागले आहेत. पावसाअभावी रखडलेली भातरोप पुनर्लागवड आता गती घेईल, अशी अपेक्षा आहे. मागील काही दिवसांपासून पावसात सातत्य नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र आता नव्याने सुरू झालेला पाऊस शेतीकामांना दिलासा देणार आहे.